बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयावर माजी मुख्यमंत्री तसंच प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे. तसंच भाजपा दिलेला शब्द पाळतं सांगत शिवसेनेला टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“मला बिहारच्या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटपापर्यंत, प्रचारापर्यंत मी सहभागी होते. शेवटच्या टप्प्यात आजारी असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. पण मोदींच्या सभांपर्यंत संपूर्ण व्यवस्थेत होतो. हा एक वेगळा अनुभव आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये काही असलं तरी राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरुक आहे. एक वेगळ्या प्रकारचं राजकारण पहायला मिळतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

आणखी वाचा- अभिनंदन करणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, “लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती. लालूंच्या काळापासून ते होत आहे. पण त्याचं मतांमध्ये परिवर्तन होऊ शकलं नाही. पण यावेळी एक मीडिया हाइप झाला. आम्ही धोरणात्मक जास्त बदल न करता लालूंचं राज्य कसं होतं याची आठवण करुन दिली. आपला कार्यकर्ता आत्मविश्वासाने काम करेल याची खात्री केली”.

फडणवीसांनी यावेळी नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं सांगताना म्हटलं की, “मुख्यमंत्री जेडीयूचा होईल आणि ते नितीश कुमार असतील हे आधीच ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल नाही. भाजपा शब्दाचं पक्कं आहे. महाराष्ट्रात मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल घोषणा केली होती. आम्ही त्यावर अडून राहीलो. इथे मोदींनी जेडीयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करु”.

आणखी वाचा- बिहारमधील यशानंतर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार?

“प्रत्येक निवडणूक काही तरी शिकवून जाते. शिकत प्रगल्भता येत असते. महाराष्ट्रातील अनुभवाच्या आधारे बरेच निर्णय घेताना फायदा झाला,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. शरद पवारांना केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार साहेब मोठे नेते आहेत त्यावर काही बोलायचं नाही. माझ्यामुळे निवडणूक जिंकलो असं मी म्हटलेलं नाही असं ते म्हणाले.

“महाराष्ट्रासहित इतर राज्य सरकारं टीका करत असताना मोदी गरीबांची सेवा करत होते. अविरत प्रयत्न केले. त्यांच्या घरी चूल पेटली पाहिजे, खात्यात पैसा गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते. फक्त बिहार नाही तर संपूर्ण देशातील पोटनिवडणुकीत लोकांनी विश्वासाची लाट दाखवली आहे. त्यामुळे हा मोदींच्या विश्वासाचा विजय आहे. त्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचा आनंद,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

आणखी वाचा- बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री?; नितीश यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला?

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. अशा प्रकारे ते नेहमीच युक्तीवाद करत असतात. मॅन ऑफ द मॅच, सीरिज नरेंद्र मोदी आणि भाजपाच आहेत. “नितीश कुमारांचा चेहरा बेदाग आहे. काम झालं की नाही यावर चर्चा करु शकता पण चेहऱ्यावर डाग लावू शकत नाही. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिलं आहे”.

बिहारचा महाराष्ट्र होईल का? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “दोन्ही वेगळी राज्यं आहेत. बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. भाजपा त्याला पूर्ण समर्थन देईल”. नैतिकता सोडून ज्यावेळी युती करता तेव्हा जनता उत्तर देत असते अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

आणखी वाचा- “भाजपा-संघाला सोडा आणि…”; नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपामध्ये कार्यकर्ते, नेते तयार करत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही संधी देण्यात आली. अशा अनेक संधी मला मिळतील ज्यामुले मलादेखील प्रगल्भता मिळेल, पण सध्यी मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे”.

महाराष्ट्रातील राजकारण पलटणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “आमच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्या मतदारांचा, मोदींवर प्रेम करणाऱ्या जनतेचा विश्वास वाढला आहे. पण सध्या आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. ती भूमिका निभावणार आहोत. सध्या शेतीचं संकट निर्माण झालं आहे, त्यांची दिवाळी अंधारात चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भाजपा करेल”.