बिहारमधील यशानंतर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार?

बिहारचा महाराष्ट्र होईल का?

संग्रहीत छायाचित्र
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर प्रभारी म्हणून काम पाहिलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्रा आपण राज्याच्या राजकारणातच राहणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्यांनी बिहारमधील निकालानंतर राज्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचंही म्हटलं आहे.

बिहारचा महाराष्ट्र होईल का? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “दोन्ही वेगळी राज्यं आहेत. बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. भाजपा त्याला पूर्ण समर्थन देईल”.

आणखी वाचा- नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधत दिलं उत्तर; म्हणाले…

महाराष्ट्रातील राजकारण पलटणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “आमच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्या मतदारांचा, मोदींवर प्रेम करणाऱ्या जनतेचा विश्वास वाढला आहे. पण सध्या आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. ती भूमिका निभावणार आहोत. सध्या शेतीचं संकट निर्माण झालं आहे, त्यांची दिवाळी अंधारात चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भाजपा करेल”.

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपामध्ये कार्यकर्ते, नेते तयार करत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही संधी देण्यात आली. अशा अनेक संधी मला मिळतील ज्यामुले मलादेखील प्रगल्भता मिळेल, पण सध्यी मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे”.

आणखी वाचा- अभिनंदन करणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले…

नैतिकता सोडून ज्यावेळी युती करता तेव्हा जनता उत्तर देत असते अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. अशा प्रकारे ते नेहमीच युक्तीवाद करत असतात. मॅन ऑफ द मॅच, सीरिज नरेंद्र मोदी आणि भाजपाच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिलं आहे”.

“सरकारचं अपयश लपवा हेच त्यांचं काम आहे. डिफेन्सच्या फळीत ते अग्रकमावर आहेत. आणि मग ज्यावेळी लॉजिक नसतं तेव्हा काहीतरी सांगून सरकारचं अपयश लपवत असतात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp devendra fadanvis on bihar assembly election result national politics sgy