भारतीय जनता पक्षाचे(भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी गोव्यामध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे, बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यावरून भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह आणि इतर भाजपनेत्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच, यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, उमा भारती, योगी आदित्यनाथ व शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा बैठकीला गैरहजर असल्यामुळे मोदींच्या नियुक्तीनिर्णयावरून भाजप द्विधा मन:स्थितीत आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनीही पत्रकारांनी मोदींच्या नियुक्ती निर्णयावरून प्रश्न विचारले असता सारवासारव केली. ते म्हणाले, “उद्या पर्यंत थांबा, भाजपमध्ये पक्षाच्या वरच्या पातळीवरील नेत्यांच्या एकमताशिवाय आम्ही कोणतेही निर्णय घेत नाही.” त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या भाजप प्रचाप प्रमुखपदी नरेंद्र मोदींच्या नावाबाबत घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे.