गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपमधील काही नेते आजारी पडले असल्याची टीका कॉंग्रेसने शुक्रवारी भारतीय जनता पक्षावर केली. मोदींमुळे देशाची काय अवस्था होईल, याचा विचार भाजपने करायला हवा, असाही उपरोधिक सल्ला कॉंग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवार आणि रविवार दोन दिवस गोव्यात होणार आहे. या कार्यकारिणीचे विषय ठरविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक शुक्रवारी गोव्यात होणार होती. या बैठकीला लालकृष्ण अडवानी तब्येत ठिक नसल्याने उपस्थित राहिले नाहीत. उमा भारती आणि जसवंतसिंह हे देखील शुक्रवारच्या बैठकीला आलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर अल्वी यांनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढविला.
मोदींमुळे देशाची परिस्थिती काय होईल, याचा विचार भाजपने केला पाहिजे. मोदींमुळे जे जे आजारी पडले आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या सदिच्छा आहेत, असे अल्वी यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये सध्या मोदी गट विरुद्ध अडवानी गट अशी स्पर्धा असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केली.