भाजपा सरकारने सैन्य दलाचंही राजकारण केलं. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा लष्करावरून कधीच राजकारण झालं नाही. तेव्हा सर्जिकल झाल्याचं जनतेला कळतंही नव्हतं. पण आता भाजपा सर्जिकल स्ट्राइकचा वापर जाहिरातीप्रमाणे करू लागली आहे, अशी टीका अभिनेत्री स्वरा भास्करने केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वराने भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

‘जे सत्तेत आहेत ते उत्तर देण्यास जबाबदार असतात. विरोधकांना सत्तेत असलेल्यांनी प्रतिप्रश्न विचारून उपयोग नाही. विरोधक जेव्हा सत्तेत येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारलेच जातील. पण ज्यांनी चर्चेला सुरुवात केलीये त्यांना जबाबदार ठरवलंच पाहिजे,’ असं ती म्हणाली.

यावेळी स्वरा भास्करने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीका केली. ‘मुद्दा राष्ट्रवादाचा असो, धर्माचा असो, नागरिकत्वाचा असो किंवा सैन्याचा, भाजपाने ही संपूर्ण चर्चा एकाच दिशेने पुढे नेली आहे. मला माझ्या धार्मिक विचारांबद्दल बोलायची इच्छा नाहीये. पण तरीही ते बोलावं लागत आहे. कारण त्यांनी एका अशा व्यक्तीला उमेदवारी दिली आहे, जी भगवी वस्त्रे परिधान करते, देवाचं नावही घेते आणि त्याच व्यक्तीवर दहशतवादी असल्याचा आरोप आहे.’