एक्स्प्रेस वृत्त, कोलकाता

भाजपचे खासदार अर्जुन सिंह हे तृणमूल काँग्रेसमध्ये परतले असून हे भाजपसाठी नुकसानकारक असल्याचे भाजप नेत्यांनी मान्य केले आहे. पश्चिम बंगालमधील ताग उद्योगाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सिंह यांनी केंद्राला लक्ष्य केले होते.

सिंह यांनी काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील टीकाही सौम्य केली होती. त्यावरून ते पुन्हा तृणमूलच्या वाटेवर असल्याचा अंदाज बांधला जात होता. केंद्राच्या ताग उद्योगाबाबतच्या धोरणांवर टीका करतानाच अर्जुन सिंह यांनी आपण भाजपमध्ये मुक्तपणे काम करू शकत नसल्याची तक्रारही केली होती. त्यांनी रविवारी कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कॅमॅक पथावरील कार्यालयात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. तत्पूर्वी बॅनर्जी यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांशी अर्जुन सिंह यांच्या पक्षात परतण्याबाबत विचारविनिमय केला. यात बराकपूर आणि उत्तर २४ परगणा भागातील नेत्यांचा समावेश होता.    

अर्जुन सिंह यांनी नुकतीच दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. त्या वेळी त्यांनी प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाला उमेदवारांची चुकीची निवड कारणीभूत ठरल्याचा दावा केला होता. 

भाजपचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाझरा यांनी प्रतिक्रियेदाखल सांगितले की, कुणी स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण करीत असेल तर त्यावर आम्ही काय बोलावे? पण हे आमच्यासाठी मोठे नुकसानकारक आहे. 

काँग्रेसचा आरोप

* अर्जुन सिंह हे भाजपमधून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतल्याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, हा भाजप आणि मोदी यांच्यातील जुना समझोता आहे. मोदींची माणसे दीदीच्या पक्षात जातील आणि दीदींची माणसे मोदींच्या पक्षात जातील. दीदींच्या पक्षातील सर्व भ्रष्ट नेते पुन्हा त्यांच्याकडे परततील.

* माकपचे नेते सुजन चक्रबर्ती म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी अर्जुन सिंह हे गुन्हेगार असल्याचे म्हटले होते. ते इकडून तिकडे जात असतात.