आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एस. श्रीशांतला केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. श्रीशांतने अद्यापपर्यंत भाजप पक्षात प्रवेश केला नसला तरी आज तो लवकरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. श्रीशांत एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांचे समर्थक के.बाबू यांचा हा मतदारसंघ असून १९९१ पासून ते या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. दरम्यान, श्रीशांतला निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारले असता, एक दिवस थांबा, तुम्हाला उत्तर मिळेल, असे त्याने सांगितले. १६ मे रोजी केरळ विधानसभेसाठीची निवडणूक होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर त्याने आपला मोर्चा क्रिकेटकडून चित्रपट क्षेत्राकडे वळवला होता. तो सध्या पुजा भटसोबत एका चित्रपटाची निर्मितीदेखील करत आहे.