आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये होते आहे. या बैठकीला पक्षाचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे या बैठकीला अनुपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यावरून कट्टर हिंदूत्त्ववादी संघटनांकडून तसेच भाजपमधील नेत्यांकडून दबाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी होत असलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकांसाठी नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीत असणार आहेत, असे निवेदन भाजपच्या गुजरातमधील शाखेने बुधवारीच प्रसिद्धीस दिले होते. मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी खासदार आणि पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. मुंडे आणि मोदी यांच्यामध्ये सुमारे दोन तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.