काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून ‘भारत जोडो’ यात्रेमुळे चर्चेत राहिले आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका करताना दिसत आहेत. शिवाय, यात्रा ज्या ज्या भागातून जाते, त्या भागात स्थानिक सामान्य लोकांशी मिसळून जात असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमंधून दिसून येत आहे. मात्र या यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या काही विधानांवरून वादही निर्माण झाला आहे. असाच वाद त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण होताना दिसत आहे.

भारत जोडो यात्रा आणि वाद!

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान मोठा जनसमुदाय आपल्यासोबत जोडल्याचं दिसत आहे. मात्र, महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती आणि ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

जयपूरमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचल्यानंतर तिथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी चीनकडून भारताच्या सीमारेषेवर केल्या जात असलेल्या कुरापतींचा उल्लेख केला. “चीनचा वाढता धोका मला अगदी स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी त्याकडे लक्ष वेधत आहे, पण सरकार मात्र दुर्लक्ष करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही वा तो लपवलाही जाऊ शकत नाही. मोदी सरकार काहीही ऐकून घेण्यास तयार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

चीन युद्धाच्या तयारीत, मोदी सरकार निद्रिस्त! राहुल गांधी यांची टीका

“चीनने २००० किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर २० भारतीय जवानांचाही बळी घेतला आहे. शिवाय, हल्लीच अरुणाचल प्रदेशात आपल्या जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला”, असा दावा राहुल गांधींनी यावेळी केला.

“जर मल्लिकार्जुन खर्गे ‘रिमोट कंट्रोल’वर चालत नसतील…”

दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असताना भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “जर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘रिमोट कंट्रोल’वर चालत नसतील आणि जर विरोधी पक्ष देशहिताच्या बाजूने असेल, तर काँग्रेसने राहुल गांधींना त्यांच्या वक्तव्यासाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे”, असं भाटिया म्हणाले.

“जर काँग्रेसने राहुल गांधींविरोधा कारवाई केली नाही तर त्यावरून असा अर्थ निघेल की राहुल गांधींचं वक्तव्य विरोधी पक्षाची मानसिकताच व्यक्त करत आहे”, असंही भाटिया म्हणाले.