बोधगयामधील महाबोधी मंदिरात गेल्या रविवारी पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे केवळ दहशत पसरवण्यासाठीच घडवून आणण्यात आले होते, अशी शक्यता तपास अधिकाऱयांनी व्यक्त केली. रविवारी पहाटे मंदिरात दहा स्फोट झाले होते आणि तीन ठिकाणी ठेवण्यात आलेले बॉम्ब सुरक्षारक्षकांनी निकामी केले होते.
महाबोधी मंदिर परिसरात झालेल्या दहा बॉम्बस्फोटांपैकी केवळ एकच स्फोट जास्त तीव्रतेचा होता, अशी माहिती तपासात स्पष्ट झाली. स्फोट घडवून आणण्याची वेळ आणि स्फोटके ठेवण्यात आलेली ठिकाणे यामुळे तपासपथकाला सध्या कोडे पडले आहे. हल्लेखोरांनी दोन बॉम्ब हे १६ फूट उंचीवर असलेल्या प्लॅटफॉर्म ठेवले होते. एवढ्या उंचीवर हे बॉम्ब का ठेवण्यात आले होते, याचा उलगडा अजून झालेला नाही. या दोन बॉम्बच्या स्फोटांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असेही तपासात आढळले.
ज्या बॉम्बची तीव्रता सर्वाधिक होती, तो एका रुग्णवाहिकेखाली ठेवण्यात आला होता. या ठिकाणीही बॉम्ब ठेवण्यामागील कारण स्पष्ट झालेले नसून, याही स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
केवळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठीच हे स्फोट घडवून आणण्यात आले असावेत. यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, हे अद्याप समजलेले नाही, असे बिहारचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. के. भारद्वाज यांनी सांगितले.