ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. १९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
Veteran actor #ShashiKapoor passes away in Mumbai at the age of 79 pic.twitter.com/8ov492cn3D
— ANI (@ANI) December 4, 2017
२०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
शशी कपूर यांनी हिंदी तसेच इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. निर्माते म्हणून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली होती. तसेच ६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकीरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.
शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने कलात्मकतेची कास धरत निर्माता होण्याचे धाडस दाखवले. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.