अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये २०२२-२३ च्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना या अर्थसंकल्पातून लोकप्रिय घोषणा करून तात्पुरता राजकीय लाभ मिळवण्याचा मोह टाळला असला तरी, पगारदार-मध्यमवर्ग करदाते, गरीब-श्रमिक, शेतकरी-छोटे उद्योजक आदी विविध समाजघटक ‘अर्थलाभा’पासून वंचित राहिल्याचं चित्र दिसत आहे. मात्र असं असलं तरी निर्मला सीतारामन यांचं भाषण आणखीन एका कारणासाठी चर्चेत राहिलं ते म्हणजे त्यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी घेतलेल्या कमी वेळेसाठी. अवघ्या दीड तासामध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला यांचं महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी कौतुक केलंय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी चौथा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या दोन अर्थसंकल्पीय भाषणापेक्षा यंदाचे भाषण आटोपशीर होते. गेल्या वर्षी सीतारामन यांचे भाषण दोन तासांहून अधिक तास सुरू होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी भाषणातील शेवटची चार पाने न वाचताच अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला होता. यंदा मात्र सीतारामन यांनी जाणीवपूर्वक अर्थसंकल्पीय भाषण दीड तासांत पूर्ण केले. विरोधी सदस्यांकडे लक्ष न देता त्यांनी अर्थसंकल्पाचे सलग वाचन केले.
आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन निर्मला यांना टॅग करुन त्यांचं कौतुक केलंय. “संक्षिप्तता हा नेहमीच एक गुण राहिला आहे. निर्मला सीतारामन यांनी थोडक्यात सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रभावी ठरेल,” असं महिंद्रा म्हणालेत.
यावेळी निर्मला त्यांच्या भाषणात ना शेरो-शायरी होती ना कवितेच्या ओळी. शिवाय, सीतारामन यांनी संदर्भासह अर्थ स्पष्ट करताना होणारी मुद्दय़ांची पुनरावृत्तीही टाळली.