सीरियात आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास वर्षभरापूर्वी घरातून पसार झालेल्या ब्रिटनमधील तीन शाळकरी विद्यार्थिनी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर शाळकरी विद्यार्थिनींशी त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले सर्व प्रकारचे संपर्क तुटल्याने या विद्यार्थिनी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शमिमा बेगम (१६), कादिझा सुलताना (१७) आणि अमिरा अबासे (१६) अशी या विद्यार्थिनींची नावे असून त्या पूर्व लंडनमधील बेथनल ग्रीन अकादमीच्या विद्यार्थिनी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या विद्यार्थिनी घरातून पसार झाल्या होत्या.

‘जिहादी वधू’ होण्यासाठी दहशतवादी गटाने मान्यता दिलेल्या व्यक्तींशी या विद्यार्थिनींनी विवाह केला होता. त्यांपैकी दोन जण सीरियात आल्यापासून काही महिन्यांतच विधवा झाल्या, असा त्यांच्या कुटुंबीयांचा अंदाज आहे. आमच्यापासून जवळच बॉम्बस्फोट होत आहेत त्यामुळे संपर्क तुटण्याची शक्यता आहे, एवढाच अखेरचा संदेश त्यांच्याकडून आल्याचे दोन कुटुंबीयांच्या सॉलिसिटर तस्नीम अकुनजी यांनी सांगितले. या तीन विद्यार्थिनींपैकी एकीने कुटुंबीयांशी संपर्क ठेवला होता. आम्ही सर्व जणी राक्का येथे असल्याचे तिने डिसेंबर २०१५ मध्ये पाठविलेल्या संदेशात म्हटले होते.