सुटीनंतर सोमवारी सुरू होणारे संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचे दुसरे सत्र अधिक फलदायी असेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची अधिवेशनासाठी पूर्वतयारी करून घेण्यासाठी येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
देशात गेल्या काही वर्षांत संसदेची कार्यक्षमता घटली होती. आता स्थिर सरकार आल्याने ती १२५ टक्क्यांवर पोहोचली आहे. अधिवेशनाच्या सुटीच्या काळात खासदारांना अर्थसंकल्पाबाबत मतदारांच्या प्रतिक्रिया समजल्या असतील. त्यामुळे ते अधिक अभ्यास करून व ताजेतवाने होऊन दुसऱ्या सत्रात भाग घेतील आणि विरोधी पक्षांचा विरोध न जुमानता अधिवेशन यशस्वी करतील, असे मोदी म्हणाले.
गेले दोन महिने अज्ञात स्थळी सुटीवर गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुनरागमनानंतर विरोधकही अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून पुन्हा रणकंदन माजण्याची शक्यता आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांनी बहुसंख्येने सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. तसेच भाजप खासदारांना जे काही सुटीवर, आत्मचिंतनासाठी जायचे असेल ते अधिवेशनानंतर जावे, असे म्हणत त्यांनी राहुल यांना थेट उल्लेख न करता कोपरखळीही मारली.