बांगलादेशमध्ये शनिवारी (२२ जुलै) एक बस थेट तळ्यात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. बांगलादेशमधील झालाकाठी सदरमधील छत्रकांडा भागात ही घटना घडली. याबाबत एएनआयने डेली स्टारच्या वृत्ताच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
बस अपघातामध्ये ज्यांचा जीव वाचला त्यांनी हा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या बसची क्षमता ५२ प्रवाशांची होती, मात्र अपघात घडला तेव्हा बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते.”
“बस चालवताना चालक वाहकाशी बोलत होता आणि…”
बस अपघात बचावलेले प्रवासी मोमिन यांनी सांगितलं, “मी भंडारिया येथून बसमध्ये बसलो. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनेकजण बसमध्ये उभे होते. मी पाहिलं तेव्हा बस चालवताना चालक वाहकाशी बोलत होता आणि अचानक बस रस्त्यावरून खाली गेली आणि तळ्यात पडली.”
हेही वाचा : नागपूर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ; सहा महिन्यात ५७६ अपघात, १४१ जणांचा मृत्यू
“बस तळ्यात पडल्यावर सर्व प्रवासी बसमध्ये अडकले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने तळ्यात पडल्यानंतर लगेचच बस बुडाली. मी कसंतरी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालो,” असंही या प्रवाशाने नमूद केलं.