बालाकोट हल्ल्यांच्या खरेपणाबाबत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ‘देशद्रोही’ म्हणणे हे बुचकळ्यात टाकणारे असल्याचे मत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी व्यक्त केले. तथापि, निवडणुकीचा रोख बेकारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून इतरत्र वळवण्याच्या जाळ्यात विरोधी पक्षांनी अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणुकीतील राजकीय विषय बालाकोट हल्ल्यांपुरता मर्यादित करण्याचा केवळ भाजपला निवडणुकीत फायदा होईल, असेही मुफ्ती म्हणाल्या. निवडणुकीचा संपूर्ण रोख नोटाबंदी, जीएसटी, बेकारी, शेतकऱ्यांच्या समस्या यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरून या हल्ल्यांकडे वळवण्याच्या जाळ्यात विरोधी पक्षांनी अडकायला नको. केंद्र सरकारने बालाकोट हल्ल्यांच्या तपशिलांबाबत संदिग्धता बाळगली असल्याने, या हल्ल्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न विचारण्याचा या देशाच्या नागरिकांना पूर्ण अधिकार आहे, असेही मेहबूबा यांनी सांगितले.

बालाकोट हल्ल्याचा उद्देश मनुष्यहानी नव्हे, भारताची सक्षमता सिद्ध करण्याचा -अहलुवालिया

पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी हल्ल्यांचे पुरावे देण्याची मागणी विरोधी पक्ष करत असतानाच; या हल्ल्यांचा उद्देश मनुष्यहानी करण्याचा नव्हता, तर भारत हा शत्रूच्या प्रदेशात खोलवर शिरण्यास सक्षम असल्याचा संदेश देणे हा होता, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारच्या कुणाही प्रवक्त्याने या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या दिलेली नव्हती. याउलट, भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर ठार झालेल्या दहशतवाद्यांचा दुजोरा न दिलेला आकडा पसरवला जात होता, असे अहलुवालिया म्हणाले.

हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची एक सभा झाली आणि त्या वेळी ते ठार झालेल्यांच्या संख्येबद्दल काहीच बोलले नाहीत. पंतप्रधान मोदी, सरकारचा कुणी प्रवक्ता किंवा आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी यांनी काही आकडा सांगितला आहे काय हे मी विचारू इच्छितो, असे अहलुवालिया यांनी शनिवारी सिलिगुडी येथे पत्रकाराशी बोलताना विचारले.