ओटावा (कॅनडा) : पाकिस्तानी वंशाचे कॅनडाचे पत्रकार तारेक फतह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची पत्रकार मुलगी नताशा यांनी ही माहिती दिली. ‘पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाप्रेमी, सत्यवचनी, न्यायासाठी लढवय्या, वंचितांचा आवाज’ अशा शब्दांमध्ये नताशा यांनी आपल्या पित्याचे वर्णन केले. फतह हे अनेक भारतीय वृत्तवाहिन्यांवर राजकीय चर्चेमध्ये सहभागी होत असत.

फतह यांचा जन्म १९४९ साली कराचीमध्ये झाला. ते १९८६ साली कॅनडाला स्थलांतरित झाले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोक व्यक्त केला आहे. फतह यांचे पत्रकार म्हणून तसेच लेखक म्हणून योगदान नेहमी स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.