केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टरला धमकावून त्याच्याकडून ५० लाख रूपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

राकेश अस्थाना यांच्याव्यतिरिक्त चंदिगडचे माजी पोलीस महानिरीक्षक तेजिंदर सिंह लुथरा आणि पोलीस उपअधीक्षक सतीश कुमार तसेच पोलीस निरीक्षक अश्वनी कुमार यांच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (दक्षता) मुख्य अधिकारी आणि सल्लागार मनोज परिदा यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या अधिकाराचा गैपवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

चंदिगड येथील डॉक्टर मोहित दिवाण यांनी यासंदर्भातील तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये दिवान यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात अस्थाना यांना पैसे दिले नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दिवाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आता ही चौकशी सुरू करण्यात आली. आस्थाना यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अलोक कुमार आणि त्यांच्यात झालेल्या वादातून ते चर्चेत आले होते. तसंच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला दाखल केला होता.

काय आहे हे प्रकरण?
डॉक्टर मोहित दिवान यांनी राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरून डीजीपी लुथरा यांनी ५० लाख रूपये उकळले असल्याचा आरोप केला आहे. त्यांना एका परदेशी रूग्णाला हे पैसे द्यायचे होते. त्यासाठी सतिश कुमार आणि अश्वनी कुमार यांनी डॉक्टर दिवान यांच्यावर दबाव आणला. तसंच त्यांच्या निवासस्थानी पोलीसही पाठवण्यात आले. अनेकदा त्यांना मुख्यालयात नेऊन धमकावल्याचा आरोपही दिवाण यांनी केला आहे.