अटक वॉरण्ट जारी करण्याची सीबीआयची मागणी

कोलकाता : कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी सीबीआयने गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले आणि शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणीच्या चौकशीसाठी त्यांना शुक्रवारी ११ वाजता हजर होण्यास सांगितले आहे.

राजीवकुमार हे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक असून या घोटाळ्यातील महत्त्वाचे पुरावे लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आतापर्यंत ते सीबीआयच्या चौकशीला गैरहजर राहिले असून त्यांचा ठावठिकाणाही लागलेला नाही. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांचा एका पंचतारांकित हॉटेलमध्येही शोध घेतला.

दरम्यान, शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्याविरुद्ध अटक वॉरण्ट जारी करण्याची मागणी गुरुवारी सीबीआयने न्यायालयाकडे केली.

या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राजीवकुमार यांच्यावर अनेकदा नोटिसा बजाविण्यात आल्या असतानाही ते सीबीआयसमोर हजरच झाले नाहीत. राजीवकुमार चौकशीला सहकार्यच करीत नाहीत, असे सीबीआयच्या वकिलांनी अलिपोरचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सुब्रत मुखर्जी यांना सांगितले.

राजीवकुमार यांच्या वकिलांनी सांगितले की, राजीवकुमार हे साक्षीदार आहेत, आरोपी नाहीत, त्यामुळे न्यायालय या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरण्ट जारी करू शकत नाही. राजीवकुमार हे फरार नाहीत, आपण १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध नसल्याचे त्यांनी सीबीआयला कळविले आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.