भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले भारतीय पथक सोमवारी इटलीला रवाना होणार आहे. मंगळवारी तेथे पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचारासंदर्भात हे पथक पुरावे जमा करेल.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे ४ हजार कोटींचे कंत्राट आपल्याला मिळावे म्हणून इटलीतील फिनमेक्कानिका कंपनीने सुमारे साडेतीनशे कोटींची लाच दिल्याचे उघड झाल्यानंतर भारत सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या प्रकरणी इटलीत सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयाने भ्रष्टाचाराचे पुरावे भारताला सोपवण्यात नकार दिल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच या गैरव्यवहाराबाबत संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. या पाश्र्वभूमीवर सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवारी इटलीला रवाना होणार आहे. यामध्ये सीबीआयचे एक उपमहानिरीक्षक, एक विधी अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील संयुक्त सचिव पदावरील अधिकारी आणि परराष्ट्र खात्याच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात हे पथक सोमवारीच इटलीत दाखल होणार होते. मात्र, काही तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने हे पथक मंगळवारी इटलीला पोहोचेल.  सीबीआयने स्थानिक वकिलाचीही नियुक्ती केली असून गैरव्यवहार प्रकरणातील कागदपत्रे न्यायालयातून मिळवण्यासाठीही हा वकील सीबीआयला मदत करणार आह़े
कॅमेरून यांच्याकडून माहिती मिळवण्यावर भर
इटलीच्या कंपनीसोबत हेलिकॉप्टर खरेदी व्यवहार प्रकरणात झालेल्या ३६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडून अधिकाधिक सहकार्य मिळवण्यासाठी भारतातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे. ते सोमवारपासून भारत भेटीवर येत आहेत.