भारतीय अभिजात कलेने ख्रिस्ती येथे झालेल्या एका लिलावात नवा विक्रम प्रस्थापित केला. वासुदेव गायतोंडे, तय्यब मेहता आणि एम. एफ. हुसेन यांच्यासारख्या दिग्गज चित्रकारांनी काढलेली चित्रे तब्बल ४.७ दशलक्ष पौंडांना विकली गेली. दक्षिण आशियाई आणि अभिजात कलाकृतींचा लिलाव करण्यात आला. त्याच्या विक्रीतून गायतोंडे यांच्या कलाकृती सहा लाख २५ हजार ८७५ पौडांना विकल्या गेल्या. गायतोंडे यांची सर्व चित्रे १.२ दशलक्ष पौंडांहून अधिक किमतीला विकली गेली.
यापैकी बहुतेक चित्रे खासगी रसिकाने खरेदी केली असून गेल्या ५० वर्षांत इतक्या मोठय़ा रकमेला विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी काही चित्रे २०१४मध्ये न्यूयॉर्कमधील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. अबू धाबी आणि लॉस एन्जेलिस येथील वस्तुसंग्रहालयातही प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत.
एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांनाही विशेषत: अश्वमालिकेच्या चित्रांचा लिलाव अर्धा दशलक्ष पौंडाहून अधिक किमतीला करण्यात आला. महाभारत मालिकेतील ‘गंगा जमुना’ मालिकेच्या चित्रांसाठी सहा लाख पौंडांहून अधिक रकमेची बोली लावण्यात आली. तथापि, या चित्रासाठी लावण्यात आलेली किमान बोली कोणीच न केल्याने हे चित्र विकले गेले नाही.
एम. एफ. हुसेन यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून ख्रिस्ती येथील लिलावात १९ प्रसिद्ध कलावंतांच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत, हाही एक योगायोग आहे. सय्यद हैदर रझा यांनी काढलेली रस्त्यावरील दृष्ये आणि राजस्थानी चित्रांनाही मोठी मागणी होती व त्यांची विक्री चार लाख पौंडांना करण्यात आली, तर तय्यब मेहता यांच्या चित्रांची १८ हजार ७५० पौंडांना विक्री झाली.