गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांचे स्पष्टीकरण

सरकारने श्रीनगरमधील एनआयटीमध्ये स्वत:हून केंद्रीय दले तैनात केली नाहीत तर संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून तशी विनंती आल्यानेच दले तैनात करण्यात आली, असे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने लोकसभेत दिले. सदर संस्थेत केंद्रीय दले तैनात केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली जात होती.

केंद्रीय दले तैनात करण्याचा निर्णय सरकारने स्वत:हून घेतलेला नाही, एनआयटीकडून तशी विनंती करण्यात आली होती आणि त्यामुळे दले तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला, हा केंद्र सरकारचा एकतर्फी निर्णय नव्हता, असे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

एनआयटीच्या संकुलात केंद्रीय दले तैनात करून केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर पोलिसांना कमी लेखले आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केला. त्यानंतर रिजिजू यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

टी-२० सामन्यांत भारताचा वेस्ट इंडिजने पराभव केल्यानंतर स्थानिक आणि बाहेरच्या राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये चकमक झडली होती.

नक्षलवादी संघटनांना युरोपमधील संघटनांचा पाठिंबा – रिजिजू

फिलिपाइन्स आणि तुर्कस्तानमधील नक्षलवादी संघटनांशी येथील नक्षलवाद्यांचे निकटचे संबंध असल्याचे आढळले असून त्यांना युरोपमधील अनेक संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. फिलिपाइन्स, तुर्कस्तानमधील नक्षलवादी संघटनांशी भाकपचे जवळचे संबंध असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.