देशातील सर्वात मोठय़ा कर घोटाळ्यात दोषी असलेल्या उद्योगपती हसन अली खान याच्या स्वित्र्झलडमधील बँक खात्यासंदर्भातील माहिती मिळावी यासाठी बर्न येथील भारतीय शिष्टमंडळाने स्विस प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना भारत सरकारने केली आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाच्या तपास पथकाला स्विस बँक प्रशासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी विनंती केली होती. हसनअलीच्या खात्याशी संबंधित माहिती मिळवणे सोपे जावे यासाठी गुप्त पोलिसांचे एक पथक स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. हे पथक कर घोटाळाप्रकरणात हसन अलीचे असलेले लागेबांधे उघड करणारी कागदपत्रे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.