सामूहिक बलात्कार प्रकरणाने दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यानंतर आता दिल्ली महिलांसाठी सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय सरसावले आहे. या खात्याने नेमलेल्या कृतीदलाने विविध उपाय योजना जाहीर केल्या आहेत. शाळांच्या बसगाडय़ांना पोलिसांच्या तपासणीनंतरच परवानगी दिली जाणार असून शहरातले डिस्कोथेक रात्री एकनंतर चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
संकटग्रस्त महिलांना पोलिसांची मदत मिळण्याबाबत दिल्लीत नेहमीच बेपर्वाईचा अनुभव येतो, या तक्रारीनंतर केंद्रीय गृहसचिवांनी परिस्थितीचा नव्याने आढावा घेतला. पोलिसांची तात्काळ मदत मागण्यासाठीच्या १०० या दूरध्वनीक्रमांकाचीही चाचणी त्यांनी घेतली. या क्रमांकावरून दूरध्वनी येताच घटनास्थळी तात्काळ पोलिसांचे वाहन पोहोचलेच पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
आता प्रत्येक सार्वजनिक वा खाजगी प्रवासी बसमध्ये सीसीटीव्ही वा वेबकॅमेरा असलाच पाहिजे, बसचालक-वाहक व अन्य कर्मचाऱ्यांकडे पोलिसांचा शिक्का असलेले छायाचित्रसहित ओळखपत्र असले पाहिजे, असेही आदेश देण्यात आले असून त्यांची पूर्तता १ मार्चपर्यंत न झाल्यास वाहतूक परवाना रद्द होणार आहे. या पद्धतीने पोलीस छाननी झाल्याशिवाय शाळांनी कोणतीही खाजगी बससेवा स्वीकारू नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
डिस्कोथेक तसेच पंचतारांकित हॉटेलांचे डिस्कोक्लबनी रात्री साडेबारा वाजता संगीत व वाद्यमेळा बंद करावा आणि रात्री एकपर्यंत ते पूर्ण बंद करावेत, असेही आदेशात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कृतीदलात केंद्र सरकार व राज्य सरकारचे अधिकारी, दिल्ली पोलीस, महापालिका प्रशासन यांचे प्रतिनिधी असून या दलाची बैठक दर पंधरवडय़ातून एकदा होणार असून त्यात परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.