कैलास मानसरोवर या तीर्थस्थळी जाण्यासाठी इच्छूक असलेल्या भारतीय भाविकांना चीनने व्हिसा नाकारला आहे. भारताने कलम ३७० रद्द करुन लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने ही कृती केली आहे. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

भारताने कलम ३७० रद्द करुन जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन भाग करुन त्यावर केंद्र सरकारचा अंमल प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. “काश्मीरसारख्या गंभीर विषयावर भारत आणि पाकिस्तान या देशांनी संयम बाळगावा,” भारताने सोमवारी कलम ३७० रद्द केल्यानंतर चीनने ही प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारत कधीही दुसऱ्या देशांच्या अंतर्गत प्रकरणांवर प्रतिक्रिया देत नाही, त्यामुळे भारतालाही इतर देशांकडून अशाच प्रकारची भुमिका अपेक्षित आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमाप्रश्नावर जोवर परस्पर तोडगा निघत नाही तोवर शांतता राखण्याचे धोरण अवलंबले आहे, असेही रविशकुमार यांनी चीनला भारताच्यावतीने उत्तर देताना म्हटले होते.

तत्पूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले होते की, “जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे नुकसान होत आहे. भारत-चीनच्या पश्चिमेकडील सीमारेषेवरील चीनचा भाग भारताकडून त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात दाखवला जातो याला चीनचा नेहमीच विरोध राहिल. नुकतेच भारताने त्यांच्या देशांतर्गत कायद्यात बदल करुन चीनच्या भूभागाचे नुकसान केले आहे. भारताची ही भुमिका स्विकारार्ह नाही तसेच यासंदर्भातील कराराचे भारताने पालन करायला हवे असे चीनच्या प्रवक्त्याने म्हटले होते.

केंद्र सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेत संविधानातील कलम ३७० रद्द केले. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला असून या राज्याचे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख असे दोन भागही करण्यात आले. हे दोन्ही भाग केंद्रशासित प्रदेश असणार आहेत.