एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज (गुरुवार) लडाख सीमा वादावर भारत आणि चीन यांच्यातील लष्करी चर्चेच्या शेवटच्या दोन फेऱ्यांबाबत सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासोबतच या मुद्द्यावर संसदेत योग्य चर्चेची मागणी देखील केली आहे. तसेच, भारताचे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत जाऊन पडल्याबाबतही ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओवेसी यांनी विचारले की, “हे खरे आहे की नाही याबाबत सरकार स्पष्टता करेल का? की पूर्व लडाखमधील एलएसीच्या हॉट स्प्रिंग क्षेत्रावर पीएलएच्या सैन्याने ताबा मिळवला आहे. जर तसे असल्यास, भारत-चीन सीमा वादावरील चर्चेच्या शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये काय झाले?” असा सवालही ओवेसींनी केला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देत माध्यमांवर वृत्त झळकले होते की, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) हॉट स्प्रिंग क्षेत्रावर ताबा मिळवला आहे. या वृत्ताचा हवाला देत, ओवेसी यांनी पीएलएच्या हॉट स्प्रिंग्स क्षेत्रावरील ताब्याबाबत सरकारला प्रश्न उपस्थित केले आहेत.
संवेदनशील मुद्द्यांवर सरकारचा दृष्टिकोन अस्वीकार्य –
एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या प्रादेशिक अखंडतेसह राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्यांवर सरकारची वृत्ती आणि दृष्टीकोन अस्वीकार्य आहे. मी वैयक्तिकरित्या लडाख सीमेवरील परिस्थितीबद्दल वारंवार प्रश्न विचारत आहे, आमच्या सैनिकांना त्या क्षेत्रापर्यंत जाऊ दिले जात नाही, जिथे ते पूर्वी गस्त घालत होते. मात्र सरकार अजूनही सत्य सांगण्यास टाळाटाळ करत आहे. संसदेतही त्यांनी मौन बाळगले आणि दिशाभूल केली आहे. लडाख सीमेवरील संकट आणि चीनशी सामना करण्याच्या आमच्या धोरणावर संसदेत योग्य चर्चा झाली पाहिजे.
सरकारला समाजाचे ध्रुवीकरण करण्यात जास्त रस –
भारतीय क्षेपणास्त्र चुकीने पाकिस्तानी हद्दीत जाऊन पडल्याबाबत ओवेसींनी म्हटले की, लडाखमध्ये एक सीमा संकट आहे. आपण चुकून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागतो. जनतेला माहिती दिली जात नाही. सरकारला समाजाचे ध्रुवीकरण करण्यात जास्त रस आहे. पंतप्रधान महोदय ही आपत्तीसाठी एक कृती आहे.
तर, पाकिस्तानच्या हद्दीत पडलेले क्षेपणास्त्र अनावधानाने डागले गेले होते. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जात असून या अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यसभेत दिले आहे.
भारताच्या भूमीवरून ९ मार्च रोजी पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किमी आतमध्ये पडले. मात्र हे क्षेपणास्त्र अपघाताने उडाले असून नियमित होणाऱ्या तांत्रिक व्यवस्थापनादरम्यान हा प्रकार घडला. भारतीय क्षेपणास्त्रे सुरक्षित व उच्च दर्जाची असल्याची ग्वाही राजनाथ यांनी दिली. या क्षेपणास्त्रामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पाकिस्तानने संयुक्त चौकशीची मागणी केली होती.