चिनी पोलिसांनी तिआनानमेन चौकातील कारवाईच्या स्मृतिदिनी अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई केली, तर इतरांवर पाळत ठेवण्यात आली, असे मानवी हक्क गटांनी सांगितले. सहा मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात कवी लियांग तैपिंग यांचा समावेश असून बीजिंग पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. कारण त्यांनी ४ जूनच्या कारवाईच्या निमित्ताने एक खासगी कार्यक्रम गुरुवारी घेतला होता. ४ जून १९८९ रोजी लोकशाहीवादी निदर्शने बीजिंगमधील तिआनानमेन चौकात दडपून टाकण्यात आली होती. चीनच्या वेक्वावांग या स्वयंसेवी संस्थेने सांगितले की, एक कार्यकर्ता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. लोकशाहीसाठी तिआनानमेन चौकात २७ वर्षांपूर्वी करण्यात आलेले आंदोलन दडपशाही चिरडण्यात आले होते. आज या आंदोलनाच्या स्मृती दिनी १०९ एकरच्या तिआनानमेन चौक परिसरात अशांतता माजवली जाण्याचा संशय पोलिसांना होता त्यामुळे त्याआधीच धरपकड करण्यात आली. तिआनानमेन उठावाचा उल्लेख पाठय़पुस्तके, माध्यमे व चर्चातून करण्यास बंदी आहे व माध्यमे व इंटरनेट यांच्यावर सेन्सॉरशिप लागू आहे. तिआनानमेन चौकात ज्या मुलांनी प्राण गमावले त्याच्या आई-वडिलांची संघटना तिआनानमेन मदर्स नावाने काम करते. झांग झियानिलग यांचा १९ वर्षांचा मुलगा १९८९ मध्ये मारला गेला होता. त्या आज मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या असता पोलिसांचा गराडा आजूबाजूला होता. आम्ही गेले काही आठवडे साध्या वेशातील पोलिसांच्या निगराणीत आहोत असे झांग यांनी सांगितले. मदर्स ऑफ तिआनानमेन या संघटनेने एक खुले पत्र लिहिले असून त्यात गेली २७ वर्षे दहशतीखाली मुस्कटदाबी केली जात असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे आमच्यावर तर लक्ष आहेच तसेच आमचे संगणक जप्त करण्यात आले असून अत्याचार केले जात आहेत असे ह्य़ूमन राइट्स इन चायना या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या उठावानंतर मदर्स ऑफ तिआनानमेन गट स्थापन करणाऱ्या श्रीमती डिंग झिलिन आता ७९ वर्षांच्या असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या घरी जाण्यावर २२ एप्रिल ते ४ जूनपर्यंत र्निबध घालण्यात आले होते.