जयपूर : अरुणाचल प्रदेश आणि लडाख सीमा भागात चीन युद्धाची तयारी करीत आहे, तर नरेंद्र मोदी यांचे सरकार निद्राधीन राहून संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले,‘‘चीनचा वाढता धोका मला अगदी स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी त्याकडे लक्ष वेधत आहे, पण सरकार मात्र दुर्लक्ष करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही वा तो लपवलाही जाऊ शकत नाही. मोदी सरकार काहीही ऐकून घेण्यास तयार नाही.’’

चीनची जोरदार तयारी सुरू आहे आणि ती युद्धासाठीच आहे, घुसखोरीसाठी नाही. त्यांच्या शस्त्रांचे स्वरूप आणि हालचाली पाहिल्या तर सर्व काही लक्षात येईल. पण मोदी सरकार हे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण सत्य स्वीकारणे त्याला जड जाते, अशी टीका राहुल यांनी केली. मोदी सरकार कार्यक्रमाधारित काम करते, धोरणात्मकृष्टय़ा नाही, त्यामुळेच हे घडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

चीनने २००० किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर २० जवानांचाही बळी घेतला आहे. शिवाय, हल्लीच अरुणाचल प्रदेशात आपल्या जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला, असेही राहुल म्हणाले.

नेहरूंचा नव्हे, मोदींचा नवा भारत : भाजप

नवी दिल्ली : चीनच्या धोक्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपने प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा आणि जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा १९६२चा जवाहरलाल नेहरूंचा भारत नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा नवा भारत आहे, असे भाजपने म्हटले आहे.

‘प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय दृष्टीचा अभाव’

जयपूर : कोणत्याही प्रादेशिक पक्षांकडे देशाप्रति ‘राष्ट्रीय दृष्टी’ नाही, त्यामुळेच काँग्रेस पक्ष त्यांच्यापेक्षा वेगळा ठरतो. तथापि, २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी ‘आप’ला उभे केले नसते, तर गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला असता, असेही ते म्हणाले.