बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपासमोर एक नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएतील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयू आणि रामविलास पासवान यांच्या लोजपामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. जदयूचे नेते राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर टीका केल्यानं दोन्ही पक्षातील वादाला तोंड फुटलं असून, लोजपा नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोजपातील सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयू आणि लोजपामध्ये वाद उफाळला आहे. जदयूचे वरिष्ठ नेते आणि मुंगेरचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधला होता. ललन सिंह यांच्या टीकेमुळे लोजपा नाराज असून, नितीश कुमार सरकारचा पाठिंबा काढण्याच्या विचारात आहे.

खासदार सिंह यांनी लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना कालिदास यांच्याशी केली होती. “कालिदासाप्रमाणेच ज्या फांदीवर बसलेले आहात तिच कापायला लागले आहेत,” असं सिंह म्हणाले होते. या टीकेनंतर लोजपा नाराज झाली आहे. लोजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ललन सिंह यांच्या विधानावर पक्षात चर्चा करण्यात आली. लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनीही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आणि या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. नड्डा यांच्या भेटीनंतर चिराग पासवान यांनी आज पक्षाच्या पाटणा येथील कार्यालयात बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे चिराग पासवान यांनी या बैठकीची माहिती माध्यमांना न देण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बिहारसह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लोजपाच्या एका नेत्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अपमान केला आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या सरकारचा पाठिंबा काढू शकतो,” असं ते म्हणाले. दरम्यान, लोजपा आणि जदयूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कुरबुर सुरू झाल्यानं भाजपासमोर हा वाद मिटवण्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. त्यातच लोजपानं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी व्हर्च्युअल प्रचार सभा घेण्यासही लोजपानं विरोध केल्यानं भाजपा यातून कसा मार्ग काढणार याकडे लक्ष लागलं आहे.