प्रसाद हावळे

माजी निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे प्रतिपादन; जयपूर साहित्य मेळ्यात पडसाद

सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्यापाठोपाठ संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेविरोधात देशभर विविध स्तरांतून निदर्शने होत आहेत. या दोन्हींचे विरोधक आणि समर्थकांकडून मांडल्या जाणाऱ्या मतांचे पडसाद शनिवारी जयपूर साहित्य मेळ्यात आयोजित भारतीय संविधानावरील चर्चासत्रात उमटले.

यावेळी- संभाव्य नागरिक नोंदणीसाठी मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य़ धरले जाणार नसेल तर या ओळखपत्राचा उपयोग काय, असा प्रश्न माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी चर्चेत उपस्थित केला. त्यावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी  मतदार ओळखपत्र हे इतर कुठल्याही ओळखपत्रापेक्षा महत्त्वाचे असून भारतीय मतदार ओळखपत्र असणारे सर्व या देशाचे नागरिकच आहेत असे स्पष्ट प्रतिपादन केले.

भारतीय संविधानाच्या मौलिकतेचा वेध शनिवारी जयपूर साहित्य मेळ्यातील ‘ऑफ द पीपल, बाय द पीपल’ या चर्चासत्रात घेण्यात आला. यावेळी राज्यशास्त्रचे अभ्यासक माधव खोसला यांच्यासह मार्गारेट अल्वा आणि नवीन चावला यांनी सांविधानिक मूल्ये समकालीन घडामोडींच्या संदर्भात विशद केली.  सांविधानिक असमानतेबद्दल जेवढय़ा पोटतिडिकीने बोलले जाते, तितकेच असमानतेबद्दलही बोलायला हवे. सांविधानिक संस्थांवर विश्वस ठेवायला हवा. न्यायालयानेच आजवर कळीच्या समस्यांवर तोडगा दिला आहे, असे मत मांडत चावला यांनी निवडणूक आयोगाच्या योगदानाचा आढावा घेतला.  आयोग मतदार नोंदणीतून ओळखपत्रे देत सर्व नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेत आहे, असे चावला यांनी सांगताच- पण तेच मतदार ओळखपत्र नागरिक नोंदणीत पुरावा मानला जाणार नाही, त्याचे काय काय असा प्रश्न अल्वा यांनी केला. त्यावर -देशातील कोणत्याही, किंबहुना आधार ओळखपत्रापेक्षाही मतदार ओळखपत्र सर्वोच्च आहे. ते ज्यांच्याकडे आहे ते सर्व भारतीय नागरिकच आहेत असे उत्तर चावला यांनी दिले.

इंग्रजीबरोबरच हिंदी-उर्दूचे बोल..

इंग्रजी साहित्य व्यवहार हा जयपूरच्या साहित्य मेळ्याचा गाभा आहे. यंदाच्या पर्वात मात्र काही सत्रे हिंदी-उर्दू साहित्यातील काही साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृतीभोवती गुंफलेली आहेत. शनिवारी दोन सत्रांत फैज अहमद फैज आणि फिराक गोरखपुरी यांच्या कवितांचा आणि वास्तववादी साहित्याने अजरामर ठरलेले हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा वेध घेण्यात आला. साहित्य मेळ्यातील इंग्रजी आसमंतात हे हिंदी-उर्दू बोल तरुणाईला मोहीत करताना दिसले.

ये वादी शहजादी बोलो कैसी हो..

जयपूर साहित्य मेळ्यातील अनेक सत्रांना नागरिकत्वाचा मुद्दा वेढून असला, तरी शनिवारी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या ‘शिकारा’ या आगामी चित्रपटासंदर्भातील चर्चेने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाची धग जाणवून दिली. १९९० साली चार लाखांहून अधिक काश्मिरी पंडितांना निर्वासित व्हावे लागले. त्यांचे सांस्कृतिक भावविश्व ऱ्हास पावले. त्यांच्या वेदनांचे हुंकार संसद ऐकेल, अशी सर्वच काश्मिरी पंडितांची भावना होती. आता ३० वर्षांंनी तरी त्यांचा आवाज संसदेने ऐकावा, अशी भावना विधू विनोद चोप्रा यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: निर्वासित काश्मिरी पंडित कुटुंबातील असलेल्या चोप्रा यांनी ‘ये वादी शहजादी बोलो कैसी हो..’ ही ‘शिकारा’ चित्रपटातील कविता सादर करून विवादापेक्षा संवादावर भर द्ययला हवा, अशी भूमिका मांडली.

संविधानाच्या मौलिकतेचा वेध शनिवारी जयपूर साहित्य मेळ्यातील ‘ऑफ द पीपल, बाय द पीपल’ या चर्चासत्रात घेण्यात आला. यावेळी राज्यशास्त्राचे अभ्यासक माधव खोसला यांच्यासह माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा आणि नवीन चावला यांनी सांविधानिक मूल्ये समकालीन घडामोडींच्या संदर्भात विशद केली.