अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना न्यूयॉक येथील रुग्णालयात उपचारांसाठी रविवारी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना चक्कर आली होती. हा त्रास रक्तातील गुठळ्यांमुळे झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती त्यांचे साहाय्यक मंत्री आणि प्रवक्ता फिलीप रीनेज यांनी दिली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली क्लिंटन यांच्यावर पुढील ४८ तास उपचार करण्यात येणार आहेत. क्लिंटन यांना काही दिवसांपूर्वी पोटाच्या विकार झाला होता. त्यामुळे त्यांनी बहुतांश काम घरूनच केले होते. पण येत्या काही दिवसांत त्या तंदुरुस्त होऊन पूर्ववत काम करतील, असे रीनेज यांनी स्पष्ट केले.