गुन्हे अन्वेषण विभागाने कोळसा खाण वाटपाच्या सहा प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सहा प्राथमिक माहिती अहवालांची चौकशी पूर्ण केली असून त्याचा स्थितीदर्शक अहवाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.
ज्या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली आहे त्याबाबत सूत्रांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला. सहा प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्याचे मात्र त्यांनी सूचित केले. शेवटच्या छाननी व तांत्रिक औपचारिकतेच्या पूर्ततेनंतर आता सक्षम न्यायालयात अंतिम अहवाल दाखल करण्यात येईल. सीबीआयने कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचाराबाबत १४ प्राथमिक माहिती अहवाल दाखल केले होते. त्यात एएमआर आयर्न अँड स्टील व जेएलडी यवतमाळ एनर्जी, विनी आयर्न, स्टील उद्योग, जेएएस इन्फ्रान्स्ट्रक्चर कॅपिटल प्रा.लि. विकास मेटल्स, ग्रेस इंडस्ट्रीज, गगन स्पाँज, जिंदाल स्टील अँड पॉवर, राठी स्टील अँड पॉवर लि. झारखंड इस्पात, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, कमाल स्पाँज, पुष्प स्टील, हिंदाल्को, बीएलए इंडस्ट्रीज, कॅस्ट्रन टेक्नॉलॉजीज व कॅस्ट्रन मायनिंग यांची नावे आहेत.
१९९३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या कोळसा खाणी देताना नियमांचे उल्लंघन झाले असून काही कंपन्यांना त्यात झुकते माप देण्यात आले, त्यामुळे खाणवाटप रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने कोळसा खाणी वाटपाची छाननी करून कारवाई सुरू केली होती.