कोळसा खाण वितरण गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरवून समन्स बजावण्यात आलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ऐक्य मोर्चा काढून पक्षनिष्ठांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस मुख्यालय २४, अकबर रस्त्यावरून मोर्चा काढून थेट माजी पंतप्रधानांच्या  मोतीलाल नेहरू रस्त्यावरील निवासस्थानी दाखल होत सोनिया गांधी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मनमोहन सिंग यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष उभा आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नसल्याची प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. तर पक्षाने समर्थनार्थ काढलेल्या ऐक्य मोर्चामुळे आनंदित झाल्याची प्रतिक्रिया मनमोहन यांनी नोंदवली.
सोनिया गांधी म्हणाल्या की, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आम्ही त्या प्रक्रियेचा सन्मान करतो. त्याबरोबरच आम्ही मनमोहन यांच्या पाठीशी खंबीरपण उभे आहोत. मनमोहन नक्कीच निदरेष सिद्ध होतील, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. विशेष न्यायालयाने मनमोहन यांना आरोपी ठरवून कोळसा खाण गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस कार्यसमितीची बैठक गुरुवारी झाली. बैठकीनंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐक्य मोच्र्यास प्रारंभ झाला. या मोर्चात माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँन्टोनी, शशी थरूर, वीरप्पा मोईली आदी नेते सहभागी झाले होते.