नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर झाल्यानंतर बुधवारी आचारसंहितेच्या उल्लंघनावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या नेत्यांनी धार्मिक भावनांना उत्तेजन देणारी भाषणे करू नयेत आणि काँग्रेसच्या प्रचारकांनी संविधान रद्द केले जाण्याचा गैरप्रचार करू नये, अशी समज संबंधित पक्षांच्या अध्यक्षांना देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने तर राहुल गांधींविरोधात भाजपने आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटिसा बजावल्या होत्या. यामध्ये मोदी आणि गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. दोन्ही पक्षांनी या नोटिसांना उत्तर दिले होते. त्यानंतर बुधवारी आयोगाने पुन्हा पक्षाध्यक्षांना पत्र लिहून सूचना केल्या आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक वातावरण बिघडवणारी भाषणे करण्यापासून भाजपच्या प्रचारकांना परावृत्त करावे, असे निर्देश नड्डांना दिले आहेत. पक्ष वा उमेदवाराच्या कृतीतून परस्पर द्वेष निर्माण होईल किंवा धार्मिक, भाषिक, जाती आणि समुदायांमध्ये तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commission issued notices to bjp national president jp nadda and congress party president mallikarjun kharge amy
First published on: 23-05-2024 at 04:41 IST