ओडिशातील काँग्रेसचे आमदार नाबा किशोर दास हे विधानसभेमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ क्लीप पाहात असल्याचा आरोप करीत बिजू जनता दलाच्या महिला आमदार प्रमिला मलिक यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे. विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना नाबा किशोर दास त्यांच्याकडील मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ क्लीप पाहात होतो, असे प्रमिला मलिक यांनी म्हटले आहे.
नाबा किशोर दास यांनी केलेली कृती निंदनीय असून, सभागृहाची प्रतिमा मलिन करणारी आहे. सभागृहातील महिला आमदारांचा अपमान झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली. प्रमिला मलीक या बिजू जनता दलाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. आपल्याला एका खासगी वृत्तवाहिनीवरून या घटनेची माहिती मिळाली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपण कोणतीही आक्षेपार्ह व्हिडीओ क्लीप पाहात नव्हतो, असे नाबा किशोर दास यांनी म्हटले आहे. बुधवारी विधानसभेमध्ये याबद्दल आपण आपली बाजू मांडू, असेही त्यांनी सांगितले.