स्वतंत्र तेलंगणाच्या प्रश्नावर काँग्रेस राजकारण करीत असून याबाबत चालढकल करून आंध्र प्रदेशमधील जनतेवर अन्याय करीत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.
या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका काय आहे, पक्षाचे खासदार आणि आमदार कोणत्या आधारावर  आंदोलने करीत आहेत, ते जनतेला का भडकावत आहेत, काँग्रेस आणि केंद्र सरकारमध्ये दिशादर्शनाचा अभाव आहे, केवळ दोन प्रांतांमधील जनतेला भडकावून काँग्रेस राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे रेड्डी म्हणाले.
आंध्र प्रदेशातील दोन्ही प्रातांमधून जास्तीतजास्त खासदार निवडून आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करावयाचे, हाच केवळ काँग्रेसचा कार्यक्रम आहे. काँग्रेसला आंध्र प्रदेशमधील जनतेशी काहीही देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले.
तेलंगणा प्रांतातील काँग्रेसचे नेते स्वतंत्र राज्याची मागणी करीत आहेत तर बिगर तेलंगणातील नेते एकत्रित आंध्र प्रदेशचा पाठपुरावा करीत आहेत त्याबद्दल रेड्डी यांनी तीव्र हरकत घेतली. तेलंगणाचा प्रश्न पोषक आणि सलोख्याच्या वातावरणात सोडविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.