लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असेल. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर ‘अग्निपथ’ योजना रद्द करून जुनी सैन्यभरतीची पद्धत कायम ठेवली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने सोमवारी दिले. ‘सुमारे २ लाख तरुण-तरुणींवर अन्याय करणारी योजना मागे घेण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा’, अशी मागणी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना फक्त चार वर्षांसाठी सैन्यदलात कार्यरत ठेवणारी ‘अग्निपथ’ योजना २०२२मध्ये सुरू झाली होती. मात्र, भरती केलेल्यांमध्ये केवळ २५ टक्के तरुण-तरुणींनाच सैन्यदलात कायमस्वरुपाची नोकरी मिळण्याची शक्यता असल्याने या योजनेवर काँग्रेससह विरोधकांनी कडाडून टीका केली होती. 

हेही वाचा >>>राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लढणार?

सैन्य दलाच्या नियमित भरती पद्धतीद्वारे २ लाख तरुण-तरुणींना सैन्याच्या तीन दलांमध्ये भरती करण्यात आल्याचे सांगितले गेले होते. ३१ मे २०२२ पर्यंत या तरुणांना सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असे वाटत होते. पण, केंद्र सरकारने सैन्यदलातील ही भरती बंद करून ‘अग्निपथ’ योजना आणली. त्यामुळे हे २ लाख तरुण-तरुणी भरतीपासून वंचित राहिले, असा दावा खरगे यांनी पत्रामध्ये केला आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचाही ‘अग्निपथ’वर आक्षेप असल्याचे खरगेंनी नमूद केले आहे. ‘अग्निपथ’सारखी योजना लष्करासाठी अनपेक्षित होती, इतकेच नव्हे तर हवाई दल व वायुदलासाठीही हा धक्का होता, असे नरवणे यांनी लिहिले आहे, असा उल्लेख खरगेंनी पत्रात केला आहे.

हेही वाचा >>>‘काँग्रेस काळात रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही पूर्ण केलं’, पंतप्रधान मोदींची टीका; कृष्णा-कोयनाचा केला उल्लेख

सैन्यभरतीमध्ये हात का अखडता?

केंद्राने ‘जी-२०’ शिखर परिषदेसाठी ४१०० कोटी, पंतप्रधानांच्या विमानावर ४८०० कोटी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर २० हजार कोटी, जाहिरातींवर ६५०० कोटी खर्च केले. मग, सैन्यदलातील भरतीमध्ये पैसा का वाचवले जात आहेत, असा सवाल काँग्रेसचे महासचिव सचिन पायलट यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

१० वर्षांत ६ लाखांची कपात?

लष्करामध्ये दरवर्षी सरासरी ६० हजार ते ६५ हजार भरती होत असे. गेल्या वर्षी ४५ हजार ‘अग्निवीर’ भरती झाले. सैन्यदलातील भरती कमी होत असून पुढील १० वर्षांमध्ये १४ लाखांचे सैन्य ८ लाखांपर्यंत कमी होईल, असा धोका खासदार दीपेंद्र हुडा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.