लोकसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आले आहे. अशात विविध राजकीय पक्ष भाजपाविरोधात एकत्र येत आहेत. काही वेळापूर्वीच जेडीएस म्हणजेच जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लोकसभेसाठी हातात हात घेतल्याचे जाहीर केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या दोन पक्षांनी निकालाच्या दिवशी युती केली. त्यानंतर सर्वात कमी जागा मिळालेल्या जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. कर्नाटकच्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर लोकसभा निवडणुकांसाठीही हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांचा शत्रू क्रमांक एक भाजपाच असणार आहे यात काहीही शंका नाही.

एवढेच नाही तर कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही ६ जून रोजी होणार असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खातेवाटपाबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एएनआयला सांगितले. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल आणि मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसकडे कर्नाटकातील गृह खाते, पाटबंधारे, आरोग्य, कृषी, महिला आणि बाल कल्याण यांसह २२ खाती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण अशी १२ खाती जेडीएसच्या मंत्र्यांना मिळणार आहेत. हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपाविरोधात आणखी किती पक्ष एकत्र काँग्रेस सोबत हात मिळवणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.