राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितलं की, “१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे”.

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला. त्यात पायलट यांना पाठवलेल्या नोटिसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पायलट यांनी रविवारी दिल्लीत ठाण मांडले होते.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्याआधारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या कथित कारस्थानाच्या चौकशीला गती दिली. त्यासंदर्भात गेहलोत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन २५-३० कोटी देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा आणि राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा केला. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर राजस्थान पोलिसांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाच चौकशीसाठी नोटीस बजावली. गेहलोत यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून ‘‘माझीही पोलीस चौकशी करणार आहेत,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे गृहखाते गेहलोत यांच्याकडेच आहे.

काय घडू शकते?

– विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे.
– काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढय़ा मोठय़ा संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जाते.
– भाजपतर्फे सत्ता हस्तगत करण्यासाठी मध्य प्रदेशातील ‘सत्तासूत्रा’चा वापर केला जाऊ शकतो. पायलट यांच्या समर्थक आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर विधानसभेतील संख्याबळ कमी होईल. त्यानंतर ते आमदार भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवू शकतात.
काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संख्याबळात ५० सदस्यांचा फरक असल्याने भाजपच्या गळाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसचे आमदार लागणे कठीण असल्याचे मानले जाते.

संख्याबळ

एकूण सदस्य- २००

काँग्रेस             १०७
भाजप              ७२
अपक्ष               १३
इतर पक्ष           ८