scorecardresearch

‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका

सरकारवर टीका करताना रमेश यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की ‘जी-२०’चे अध्यक्षपद आवर्तनानुसार भारताकडे येणारच होते.

‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्कप्रमुख जयराम रमेश (संग्रहित छायाचित्र) photo source : indian express file photo

नवी दिल्ली : भारताने जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या राष्ट्रगटाचे अध्यक्षपद हे आवर्तनानुसार आणि अनिवार्यपणे सदस्य राष्ट्रांकडे येत असते. यापूर्वी या राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भूषवलेल्या देशांनी याचा असा धामधूम करत नाटकी प्रचार केला नाही, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी केली आहे.

भारताने गुरुवारी जी-२० राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यानिमित्ताने मानसिकतेत मूलभूत बदल घडवून अवघ्या मानवतेच्या हितासाठी भारत या अध्यक्षपदाचा उपयोग करेल. तसेच एकता वृिद्धगत करण्यासाठी भारत कार्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. यानिमित्त देशातील ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या स्थळांसह केंद्र सरकारची अनेक संरक्षित स्मारके ‘जी-२०’च्या बोधचिन्हाच्या रोषणाईने उजळून निघाली होती.

या संदर्भात सरकारवर टीका करताना रमेश यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की ‘जी-२०’चे अध्यक्षपद आवर्तनानुसार भारताकडे येणारच होते. हे अध्यक्षपद क्रमश: सदस्य राष्ट्रांकडे येत असते. ‘जी-२०’चे पूर्वीचे अध्यक्षपद यापूर्वी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण कोरिया, फ्रान्स, मेक्सिको, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्थान, चीन, जर्मनी, अर्जेटिना, जपान, सौदी अरेबिया, इटली आणि इंडोनेशियाने भूषवलेले आहे. यापैकी कोणत्याही देशाने अशी ‘धामधूम’ करण्याचे ‘नाटक’ केले नाही. भारतात मात्र या वर्षभरासाठी मिळालेल्या अध्यक्षपदाबाबत फारच डिंगोरा पिटला जात आहे.

मला ५ एप्रिल २०१४ रोजी गांधीनगरमध्ये लालकृष्ण अडवाणींनी केलेले वक्तव्य आठवते. त्यांनी नरेंद्र मोदींना एक उत्कृष्ट सोहळा व्यवस्थापक- ‘इव्हेंट मॅनेजर’ म्हटले होते. ‘जी-२०’च्या निमित्ताने होत असलेले उपक्रम-घडमोडी याचाच भाग आहेत.

जयराम रमेश, काँग्रेसचे नेते

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:43 IST

संबंधित बातम्या