राहुल गांधी यांनी चार पानी राजीनामा लिहून पक्षाकडे सोपवला. यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची संपूर्ण भूमिका मांडली आहे. या निर्णयाचं काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी समर्थन केलं आहे. असा निर्णय घ्यायला धाडस लागतं असं प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे. तसेच माझा या निर्णयाला पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्यानंतर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची वक्तव्ये समोर येत आहेत. आता प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांचा निर्णय धाडसी असल्याचं म्हणत या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीतच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही. तरीही पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी पक्षाकडे सोपवला.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमधल्याच काही जुन्या, जाणत्या नेत्यांनी पराभवाचं खापर राहुल गांधींवर फोडलं होतं. राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है ही घोषणा द्यायला नको होती. पंतप्रधानांविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करायला नको होती. त्यांनी हे केल्यानेच काँग्रेसचा पराभव झाला असेही या नेत्यांनी म्हटले होते. त्यामुळेच अस्वस्थ असलेल्या राहुल गांधींनी त्यांचा राजीनाम्याचा निर्णय बदलला नाही. बुधवारी त्यांनी पक्षाकडे चार पानी राजीनामा सोपवला. यामध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असून असा निर्णय घ्यायला धाडस आणि धैर्य लागतं असं म्हणत प्रियंका गांधींनी या निर्णयला पाठिंबा दिला आहे.