पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. तशातच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. साध्या भोळ्या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. त्या आरोपावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उत्तर दिलं.

शेतकऱ्यांची माथी भडवकण्याबाबत आणी त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याच्या आरोपाबाबच कमल नाथ यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. “इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले शेतकरी वेडे आहेत का? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ३० वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. हल्लीचा शेतकरी हा सुशिक्षित आहे. त्याला आसापस घडणाऱ्या गोष्टींची अगदी नीट माहिती असते”, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षावर लावलेले आरोप फेटाळून लावले.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : १२ दिवसांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू

आणखी वाचा- ‘शाहीनबाग’प्रमाणेच आता साध्या-भोळ्या शेतकऱ्यांची दिशाभूल!

काय म्हणाले होते भाजपा नेते नकवी?

“जनतेला कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता विविध मुद्द्यावर नागरिकांची दिशाभूल करणे आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलीन करणे ही पद्धत विरोधी पक्ष पूर्वीपासूनच वापरत आहे. साध्या भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. शाहीनबागच्या आंदोलनाच्या वेळीदेखील असंच लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं गेलं होतं. आणि नंतर हळूहळू त्या आंदोलनात लपूनछपून राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रवेश केला होता”, असा आरोप नकवी यांनी केला.