PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वाढदिवस देशभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. भाजपा सरकारने सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची आठवण करुन देत भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कसे फोल ठरले, हे या व्हिडीओमधून दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

PM Modi Birthday Special: प्रसिद्ध वाळू कलाकराच्या नरेंद्र मोदींना अनोख्या शुभेच्छा; १,२१३ चहाच्या कपांमधून साकारले शिल्प

‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षात सरकारकडून केवळ १० लाख नोकऱ्या देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने या व्हिडीओत केला आहे. गेल्या आठ वर्षांमधील भाजपा सरकारच्या कामगिरीवर काँग्रेसकडून खोचक टीका करण्यात आली आहे. तरुणांना गेल्या ४५ वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारीची भेट मोदींनी दिल्याचा हल्लाबोल श्रीनिवास यांनी केला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये शहरी भागात ९.६ टक्के, ग्रामीण भागात ७.७ टक्के बेरोजगारी वाढल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या तरुणांना नोकऱ्या आणि नेतृत्व हवे आहे, असे श्रीनिवास एका ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

PM Modi Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

दरम्यान, पंतप्रधानावर आज देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तामिळनाडूमध्ये आज जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना भाजपाकडून २ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे. तर दिल्लीतील एका व्यावसायिकाने नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५६ पदार्थांची विशेष थाळी तयार केली आहे. ‘नमो अ‍ॅप’वर व्हिडीओ संदेश, ई कार्डच्या माध्यमातून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.