काँग्रेसमध्ये नेतृत्वावरुन वाद निर्माण झाला आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले. त्यानंतर गांधी निष्ठावान सक्रिय झाले असून, त्यांनी राहुल गांधी यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस कार्यसमितीची आज बैठक होणार आहे. त्यात अध्यक्षपदाविषयी काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. राहुल गांधी यांना अध्यक्षपदी नेमण्याची मागणी होत असली तरी स्वत: ते या पदासाठी इच्छुक नसल्याचे समजते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करा अशी त्यांची भूमिका आहे.
डॉ. मनमोहन सिंग किंवा ए.के.अँटोनी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवावे. करोना व्हायरसची साथ संपल्यानंतर पक्षाचे अधिवेशन बोलवून त्यात पुन्हा राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूिपदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची सोनिया गांधी यांनी दखल घेतली असून अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. नेत्यांनी एकत्रितपणे नवा पक्षाध्यक्ष नेमावा, आपण ही धुरा सांभाळू इच्छित नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते सलमान खुíशद, अश्विनीकुमार यांनी मात्र वेगळा सूर आळवत गांधी कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.