‘धर्मनिरपेक्षतेचा बुरखा’ हा नागडय़ा जातीयवादापेक्षा केव्हाही चांगला आहे, अशा तिखट शब्दांत आज काँग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. मोदींच्या कार्यकाळात विकासाच्या विविध कसोटय़ांवर गुजराथ गेल्या दहा वर्षांत किती पिछाडला आहे, याचीही आकडेवारी सादर करीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणीस अजय माकन यांनी मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले मोदी जर दुष्प्रचाराची मोहीम राबवून तथ्यहीन माहिती देत असतील तर आम्हालाही त्याचे उत्तर देणे भाग पडेल, असे माकन म्हणाले. मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना धर्मनिरपेक्षतेचा बुरखा नागडय़ा जातीयवादापेक्षा केव्हाही बरा, असे सांगून माकन म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेने देश जोडला जातो, तर जातीयवाद देशाचे विभाजन करतो.  
क्रीडा, पर्यटन आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांत भारत बराच मागे असल्याची मोदींची टीका खोडून काढताना त्यांनी यूपीए सरकारने दहा वर्षांत केलेली कामगिरी आणि मोदींच्या गुजरातने बजावलेल्या कामगिरीची तुलना करीत त्यांचे दावे फेटाळून लावले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भारताला अजून बरीच मोठी मजल गाठायची असली तरी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत सहा पदकेजिंकली होती, त्यापूर्वीच्या ऑलिम्पिक स्पर्धामध्येजिंकलेल्या पदकांपेक्षा दुप्पट; पण भाजपशासित गुजरात कुठे आहे, असा सवाल माकन यांनी केला. झारखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४४४ सुवर्णपदकांचा फैसला झाला, पण गुजरातच्या वाटय़ाला शून्य सुवर्णपदक आले. एकूण १४७९ पदकांपैकी गुजरातला अवघी ७ पदकेजिंकणे शक्य झाले, असा टोला माकन यांनी लगावला. भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता गाठणाऱ्या ८३ खेळाडूंमध्ये गुजरातच्या किती खेळाडूंचा समावेश होता? या प्रश्नाचे नरेंद्र मोदी उत्तर देतील काय? अगदी हरयाणासारख्या लहानशा राज्यानेही ऑलिम्पिक स्पर्धेत ६ पैकी ४ पदके पटकावली, याची जाणीव माकन यांनी करून दिली.
२००४ साली केंद्रात यूपीएची सत्ता आली तेव्हा शिक्षणावर ६८०० कोटी रुपये खर्च होत होते. २०१३-१४ पर्यंत हा आकडा ५२,८७५ कोटींवर पोहोचला. तंत्रशिक्षणावरील खर्च याच काळात ६४१ कोटींवरून ६५१८.२ कोटींवर गेला, पण २०११-१२ मध्ये शिक्षणावर १३.९ टक्के खर्च करणाऱ्या मोदींच्या गुजरातचा देशात १४ वा क्रमांक लागतो. गुजरातमधील १६ सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि २६ सरकारी पदविका महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी चारच प्राचार्य आहेत. सुमारे ६७ टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ अध्यापकांच्या जागा गेल्या दहा वर्षांपासून रिक्त आहेत. गुजरातमधील सरकारी उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये प्राचार्याची सुमारे आठ पदे रिक्त असल्याचे माकन यांनी निदर्शनास आणून दिले.
मोदींनी पुण्यात पर्यटनावर ज्ञान पाजळले, पण त्यांच्या राज्याचा देशांतर्गत पर्यटनाच्या बाबतीत देशात दहावा क्रमांक लागतो आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या बाबतीत पहिल्या दहामध्येही स्थान नाही, असे माकन यांनी नमूद केले.

राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात!
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे माकन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. त्याविषयी अजून निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. माकन यांच्यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनीही दिग्विजय सिंह यांचा दावा खोडून काढला होता.