कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिल्यानंतर आता काँग्रेसने गोव्यात भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे गोव्यातील प्रभारी चेल्ला कुमार हे गोव्यातील राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

कर्नाटकमध्ये भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करुन सत्तास्थापनेचा दावा केला. पण कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिली. संख्याबळानुसार भाजपा हा सर्वात मोठा असल्याने त्यांना संधी देण्यात आली असून १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

कर्नाटकमधील घडामोडीनंतर आता काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला १७ जागा आणि भाजपाला १२ जागा असताना भाजपाने मगोप आणि अन्य पक्षांशी युती करून सत्ता पटकावली होती. त्यामुळे कर्नाटकनुसार आता गोव्यातही सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात गोव्याचे काँग्रेसचे प्रभारी छेला कुमार हे शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपाची आता कोंडी होण्याची शक्यता आहे.