देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे चार हजार १८७ जणांचा मृत्यू झाला असून हा नवा उच्चांक आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख ३८ हजार २७० वर पोहोचली आहे. तर देशात गेल्या एका दिवसात आणखी चार लाख एक हजार ०७८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आले.

देशात सध्या ३७ लाख २३ हजार ४४६ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या १७.०१ टक्के इतके आहे तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८१.९० टक्क्यांवर आले आहे. करोनातून आतापर्यंत एक कोटी ७९ लाख ३० हजार ९६० जण बरे झाले असून मृत्युदर १.०९ टक्के इतका आहे. देशात गेल्या एका दिवसात चार हजार १८७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ८९८ जण महाराष्ट्रातील आहेत तर देशात आतापर्यंत दोन लाख ३८ हजार २७० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ७४ हजार ४१३ जणांचा समावेश आहे, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

९ लाख रुग्ण प्राणवायूवर

देशात १ लाख ७० हजार ८४१ रुग्ण हे श्वासनयंत्रावर असून ९ लाख २ हजार २९१ रुग्ण हे प्राणवायूवर आहेत, असे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.  १.३४ टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात, ०.३९  टक्के श्वासनयंत्रावर, तर   ३.७० टक्के  प्राणवायूवर आहेत.