चीनमधील वुहान शहरात करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर टप्याटप्प्यानं करोनानं जगालाच वेढा घातला. सध्या भारतातही करोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेषतः गेल्या आठवडाभरात करोना बाधिताच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. हवाई वाहतूक सेवा सुरू असताना परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला होता. यात ऑस्ट्रेलियातून परतलेल्या एका तरुणाला करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र, करोना झाल्याच्या भीतीनं त्यानं रुग्णालयातच आत्महत्या केली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

ऑस्ट्रेलियातून भारतात परतलेल्या या ३५ वर्षीय तरुणाला विमानतळावरच अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. या तरुणाला करोनाचा संसर्ग झाला असावा असा संशय डॉक्टरांना आला. त्यामुळे त्ला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्याचं स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

आणखी वाचा- दारु मिळत नाही म्हणून त्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

सातव्या मजल्यावरून मारली उडी –

रुग्णालय प्रशासनानं स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर या तरुणाला करोना झाल्याचा संशय आला. त्या भीतीतून त्याने १८ मार्च रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सफदरजंग रुग्णालयातील विलगीकरण कक्षाचा दरवाजा उघडून सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाचा रिपोर्ट आला असून, त्याला करोना संसर्ग झालेला नव्हता हे त्यातून निष्पन्न झालं आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे हा तरूण एका वर्षापासून ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात वास्तव्याला होता.