करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने केंद्र तसंच राज्य सरकारं वारंवार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं जाऊ नये अशी सूचना करत आहे. परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं हे. जैन साधू प्रमाणसागर यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

जैन साधू प्रमाणसागर आपल्या २० अनुयायांसोबत जिल्ह्यात पोहोचले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. एएनआयने गर्दीचा व्हिडीओ ट्विट केला असून यावेळी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असेल तर कारवाई करण्यात येईल”.

करोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशात करोनाचे ३९८६ रुग्ण असून २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. इंदूर, भोपाळ, उज्जैन आणि खांडवा हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत.