एकगठ्ठा मतांसाठी चटावलेल्या काँग्रेसला देशाच्या संरक्षणाची कोणतीही पर्वा नसून काँग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे, हा विश्वासच लोकांच्या मनातून पुरता ओसरला आहे, अशी घणाघाती टीका गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबाद येथे जंगी सभेत केली. पाकिस्तान, चीन आणि बांगला देशातून आमच्या हद्दीत घुसखोरी सुरू आहे, आमच्या जवानांचा शिरच्छेद झाला आणि आता जवानांना गोळ्या घातल्या गेल्या तरी हे सरकार इशारेबाजीतच गुंतले आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
केंद्रातील संयुक्त पुरोगामी सरकारला फटकारताना मोदी म्हणाले की, आमच्या जवानांचा शिरच्छेद केला गेला तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही, अशी भाषा केली होती. आज आमच्या जवानांवर थेट गोळ्या चालविल्या गेल्या आहेत मग त्या ग्वाहीचे काय झाले? १२५ कोटींचा हा देश मूकपणे पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यासमोर दबत आपलेच इशारे एक एक करून निष्प्रभ करीत आहे. अशा पंतप्रधानांच्या हाती या देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहील? या सरकारचे पाकिस्तानबाबतचे धोरण तरी काय आहे, परराष्ट्र धोरण तरी काय आहे, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची त्यांची भूमिका आणि आकलन तरी काय आहे, असा सवालही मोदी यांनी केला.
आमच्या जवानांचा शिरच्छेद झाला तेव्हा आमचे नेते जयपूरमध्ये पाकिस्तानी नेत्यांच्या सरबराईत गुंतले होते. आम्ही राजशिष्टाचार पाळत आहोत, असे समर्थन त्यावेळी केले गेले. पण जो देश आमच्या जवानांचा शिरच्छेद करतो त्याच्याशी कसला आला आहे राजशिष्टाचार, असा संतप्त सवाल मोदी यांनी केला. चीनची घुसखोरी वाढत चालली असताना आमचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद बीजिंगच्या वाऱ्या करतात आणि बीजिंगमध्ये वास्तव्य करायला आपल्याला आवडेल, अशी विधाने करतात. केरळातील आमच्या मच्छिमारांना इटलीचे नौसैनिक गोळ्या घालतात आणि वर उजळ माथ्याने आपल्या देशात निघून जातात. त्यांच्या सुटकेमागे इटलीचे हितसंबंध जपणारे कोण आहे, असा सवालही मोदी यांनी केला.
दंगलग्रस्त किश्तवारला भेट द्यायला गेलेले भाजप नेते अरुण नेहरू यांना अटकाव केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावरही त्यांनी टीका केली.
4ज्या लालबहाद्दूर स्टेडियमवर ही सभा झाली त्याची क्षमता
७० हजार आहे. प्रत्यक्षात एक लाख २० हजार लोकांची गर्दी उसळली होती. त्यांच्यासाठी शेजारच्या निजाम महाविद्यालयाच्या पटांगणावर व्यवस्था केली गेली व तिथे मोठय़ा पडद्यावर सभेचे थेट प्रक्षेपण सुरू होते.
4सभेसाठी पाच रुपयांचे प्रवेशशुल्क होते आणि त्यातून जमलेली रक्कम ही उत्तराखंडच्या पुनर्वसन कार्यासाठी वापरली जाणार आहे.
4तेलंगण राज्याला आमचा पाठिंबा होता पण तेलंगण आणि सीमांध्र जनतेत फूट पाडण्याच्याच कारवाया काँग्रेसने केल्या, अशी टीकाही मोदी यांनी केली. तेलंगण आणि आंध्रने गुजरातपेक्षा प्रगती साधावी, अशी सदिच्छाही त्यांनी दिली.
4सभेची सुरुवात मोदी यांनी तेलुगूतून केली आणि नंतरचे भाषण हिंदीतून झाले. आपल्या भाषणात त्यांनी लालकृष्ण अडवाणी हे काळा पैसा देशात आणण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची स्तुती केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेसच्या हाती देश असुरक्षित
एकगठ्ठा मतांसाठी चटावलेल्या काँग्रेसला देशाच्या संरक्षणाची कोणतीही पर्वा नसून काँग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे, हा विश्वासच लोकांच्या मनातून पुरता ओसरला
First published on: 12-08-2013 at 01:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country insecure in congress regime narendra modi